ठाणे (प्रतिनिधी) : विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार आणि शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ठाणे सिव्हिल रुग्णालयाला मंजुरी मिळालेल्या बाल डायलेसिस केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना जुलै महिन्यात दिलेल्या निवेदनावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या बैठकीत ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ. परमानंद, डॉ. उमा अली, डॉ. शानबाग (सायन हॉस्पिटल) तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, तांत्रिक आवश्यकता आणि पुढील कार्यवाही यावर सखोल चर्चा करण्यात आली.
आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, या केंद्राच्या कार्यान्वयनानंतर ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांतील बालरुग्णांना डायलेसिससाठी मुंबईत जावे लागणार नाही. स्थानिक स्तरावरच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने पालकांचा प्रवास, खर्च आणि मानसिक ताण या सर्वांवर दिलासा मिळणार आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालय कोकण-ठाणे विभागातील बाल डायलेसिस सुविधा असलेले पहिले जिल्हा रुग्णालय ठरणार आहे, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात नागरिकाभिमुख निर्णयांची जलद अंमलबजावणी होत आहे, हे लोकप्रतिनिधी म्हणून समाधानकारक आणि प्रेरणादायी आहे.

