ठाणे (कविराज चव्हाण ) : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी ₹1.25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक 2D इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. या नवीन सुविधांचे लोकार्पण ठाणे महानगर पालिकेचे महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर पिंपळोलकर म्हणाल्या की, नव्याने उपलब्ध करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन व टू-डी इको मशीनचे लोकार्पण माझ्या व उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे रुग्णांना वेळेवर आणि अचूक निदानाची सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ .प्रसाद पाटील तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.


