ठाणे (प्रतिनिधी) : बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची २८७ व्या जयंतीच्या निमित्ताने शासन स्तरातून ते नागरिकांच्या घरापर्यंत सर्व ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन देणाऱ्या संत सेवालाल महाराज यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध व्याख्यान आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. त्यानुसार ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शाळा क्रमांक ४६ येथे बंजारा समाज युवक सेवा संघाचे अनिल राठोड यांच्यावतीने संत सेवालाल महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर, रक्त तपासणी शिबिर लावण्यात आले होते तर यावेळी मातोश्री रुग्णालयाचे डॉ पांडुरंग भोसले यांनी आपला सक्रिय सहभाग दर्शविला. संत सेवालाल महाराज यांना वंदन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे आजी माजी नगरसेवक, शाखाप्रमुख,विभाग प्रमुख, गट प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मान्यवरांकडून सेवालाल महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी लोकमान्य आणि परिसरातील बंजारा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली होती.

