नांदेड : हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात नुकताच संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली होती.
समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहादतीचा गौरवशाली इतिहास समाजासमोर मांडण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि नऊ समाजांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार असून गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन व पूर्वतयारीला गती देण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

