नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात पहिले आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात 23 व 24 डिसेंबर 2025 गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे जिल्ह्याचे पहिले आदिवासी साहित्य संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून होत असून, वनवैभव शिक्षण मंडळ, आष्टी यांच्या माध्यमातून आणि महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजाची लोकसंस्कृती, भाषा, साहित्य, परंपरा आणि जीवनानुभव यांचे सर्जनशील प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटावे, या उद्देशाने हे संमेलन भरवण्यात येत आहे. संमेलनात विविध परिसंवाद, साहित्यिक चर्चा, काव्यवाचन, अनुभवकथन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २.०० वाजता ‘साहित्य निर्मिती आणि प्रकाशन व्यवहार’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्याचे अध्यक्षस्थान प्रदीप ढबळ (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई) भूषविणार आहेत.
परिसंवादात प्रा. डॉ. शिवाजी इरसे, मा. सुरज दहामकर यांचा सहभाग राहणार आहे.संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रकाश दुबळावरे (संयोजक), पल्लवी दुर्गे (संचालन) तसेच मुख्य. बी. बी. दास (आभार) हे कार्य पाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांनी या ऐतिहासिक आदिवासी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


