ठाणे (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या नेतृत्वात 22 डिसेंबर रोजी भव्य आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला आता मराठा समाजाने देखील पाठिंबा दर्शविला आहे. खासदार सुरेश म्हात्रे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांना सांगितली. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी होत असलेल्या या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मक पाठिंबा दिला आहे.

