मुंबई (कविराज चव्हाण) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईतील युवकांचा आवाज धोरणनिर्मितीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा” हे अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली हे अभियान संपूर्ण मुंबईत पार पडणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने या अभियानांतर्गत येत्या गुरुवार ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील सर्व ३६ विधानसभा क्षेत्रांतील १०० महाविद्यालयांच्या परिसरात १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींना या अभियानाशी जोडले जाणार असून त्यांच्या विचारांचा व सूचनांचा संग्रह केला जाणार आहे.
या अभियानाचा उद्देश तरुणांच्या कल्पना, विचार आणि स्वप्नांना शहराच्या विकासात व युवा सक्षमीकरणाच्या दिशेने समाविष्ट करणे हा आहे. भाजयुमो मुंबई, जिल्हा, मंडळ आणि वॉर्ड स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात सक्रिय सहभाग घेतील. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना “स्वप्नातील मुंबई” या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी दिली जाईल. या कल्पना व सूचना मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या भाजपाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.
भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “Gen Z हे आपल्या शहराचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहेत. आमचे उद्दिष्ट त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आणि त्यांच्या स्वप्नातील मुंबई घडविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हे आहे. या अभियानाद्वारे त्यांच्या सूचनांना धोरणात्मक निर्णय व विकास आराखड्यात स्थान दिले जाईल. मुंबईसारख्या महानगराच्या नवसर्जनात Gen Z आणि युवकांचा सहभाग हा शहराच्या प्रगतीचा आणि सशक्त भविष्याचा मूलाधार ठरेल.
या अभियानात रोजगार, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, वाहतूक व्यवस्थापन आणि सांस्कृतिक वारसा अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल. हे अभियान केवळ युवकांची मत जाणून घेण्याचे व्यासपीठ ठरणार नाही, तर त्यांच्या सूचनांना भाजपाच्या धोरणांमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

