मुंबई (कविराज चव्हाण ) : मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महाज्योती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी समाजातील लाभार्थीना कर्ज प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार अजित गोपछडे, आमदार अनुराधा चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे आदी उपस्थित होते.
आजच्या मेळाव्यातून २८० सशर्त हेतुपत्र, १८० कर्ज मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. महाज्योतीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याशिवाय चार ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६४ वसतीगृहांची उभारणी करण्यात आल्याची माहिती मंत्री सावे यांनी यावेळी दिली.
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार थेट कर्जाची मर्यादा १ लाखावरून दोन लाख करण्यात येणार आहे. थेट कर्ज योजनेच्या अर्जासाठी आकरण्यात येणारे १० रुपये शुल्क माफ करण्यात येणार आहे. ओबीसी व व्हीजेएनटी महामंडळाच्या २० उपकंपन्या स्थापन झाल्या असून पुढील १५ दिवसांत नवीन कंपन्यांच्या नावाने कर्ज वाटप करण्यात येईल. याशिवाय ओबीसी आणि व्हीजेएनटी महामंडळाचे भागभांडवल १ हजार कोटी करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांनी ओबीसी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान सावे यांनी यावेळी केले.

