Site Logo
मुंबई

कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिपाई भरतीत तीन टक्के आरक्षण

प्रकाशित: 16 Oct 2026, 05:00 PM
37 Views
Featured News Image

कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुती सदैव कटिबद्ध : गृहराज्यमंत्री कदम 

मुंबई (कविराज चव्हाण) : पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांप्रमाणेच कारागृह व सुधारसेवा विभागातील गणवेशधारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही कारागृह शिपाई भरतीमध्ये तीन टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गृह विभागाने बुधवारी जारी केला. कारागृह शिपाई भरतीमध्ये पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी लागू असलेल्या १० टक्के समांतर आरक्षणातून तीन टक्के आरक्षण कारागृह व सुधारसेवा विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील सर्व गणवेशधारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. कारागृह शिपाई ते तुरुंग अधिकारी या पदांवरील गणवेशधारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

      पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पोलीस शिपाई भरतीमध्ये तीन टक्के आरक्षण देण्याची तरतूद यापूर्वीच करण्यात आली होती. तसेच, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी लागू असलेले सेवाप्रवेश नियम कारागृह शिपाई, गट-क या पदाच्या भरतीसाठीही लागू करण्यात आले आहेत.पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ कारागृह व सुधारसेवा विभागातील गणवेशधारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याबाबत विचार करण्यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी कारागृह शिपाई भरतीतील संबंधित आरक्षणाच्या तरतुदीनुसार करण्यात येणार आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पोलीस दलाप्रमाणेच कारागृह व सुधारसेवा विभागातील गणवेशधारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही भरती प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ मिळावा, ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती.या मागणीची दखल घेत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.कारागृह व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शासकीय सेवेत संधीचे नवे दालन खुले होणार आहे.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे!


Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: