कंटाळलेल्या नागरिकांची मंत्री प्रताप सरनाईक, क्लस्टर अधिकाऱ्यांना निवेदन
ठाणे (प्रतिनिधी) : लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांनी आज माननीय आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक साहेब यांना निवेदन सादर करून URP–13 क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत पारदर्शकता, अधिकृत माहिती आणि थेट जनसंवादासाठी तातडीने संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे.गेल्या दहा वर्षांपासून या योजनेच्या नावाखाली विविध घोषणा व आश्वासनं दिली गेली, मात्र प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ अद्याप झालेला नाही. सीमारेषा, पात्रता, विकासक निवड आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
लोकमान्यनगर शिवसेना विभागप्रमुख संतोष अनिल ढमाले यांनी सांगितले की, “लोकमान्य नगरचा विकास हा फक्त प्रशासकीय विषय नाही, तर हजारो कुटुंबांच्या भविष्यासाठीचा निर्णायक प्रश्न आहे. शासन, ठाणे महानगरपालिका व क्लस्टर सेल अधिकारी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून योजना पारदर्शकपणे राबवावी.”
नागरिकांनी प्रशासनास मागणी केली आहे की, संयुक्त जनसंवाद सभा घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी, माहिती आणि वेळापत्रक सार्वजनिक करण्यात यावे, जेणेकरून या योजनेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल. क्लस्टर सेल सहा. आयुक्त सोमनाथ बनसोडे, प्राधिकृत अधिकारी किशोर गोळे व उप संचालक नगर रचना, क्लस्टर सेल मुळे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी विभागप्रमुख रामचंद्र गुरव, युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, राकेश शिंदे, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, शाखाप्रमुख रमेश सांडभोर, महादेव बोरकर, दिलीप केंजळे, किरण भुजबळ, सुशांत मयेकर, सुनिल जाधव, राकेश यादव,आत्माराम जाधव, अरविंद फोंडके, गणेश केसरकर, विक्रम बनकर, तसेच सर्व पदाधिकारी व लोकमान्यनगर मधील नागरिक उपस्थित होते.

