Site Logo
ठाणे

नळपाड्याच्या पुनःर्वसनासाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची एसआरए कार्यालयावर धडक

प्रकाशित: 27 Jul 2026, 03:49 PM
100 Views
Featured News Image

नळपाड्याच्या पुनःर्वसनासाठी विकासक बदलण्याची कार्यवाही सुरू होणार

ठाणे : सुभाष नगर, गांधी नगर येथील झोपडपट्टी पुनःर्वसन योजना रखडविणार्या विकासकाला नळपाडा येथील 1500 घरांच्या पुनःर्वसनाचा प्रकल्प देण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे. याविरोधात स्थानिक रहिवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांनी रहिवाशांसह एसआरए कार्यालयावर धडक दिली. यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी संबधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. याप्रसंगी सदर प्रकल्पात विकासक बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

      नळपाडा येथील 1500 घरांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एसआरए अधिकाऱ्यांनी रिट्स प्राॅपर्टी इंडिया या विकासकाला पुढे केले आहे. ही कंपनी महाकाली बिल्डर्सचा एक भाग आहे. या कंपनीला या आधी गांधी नगरमधील 2200 झोपडीधारकांनी सहमती पत्र दिले होते. त्यानंतर 400 घरे पाडण्यात आली. मात्र, त्यांना अद्याप भाडे अदा करण्यात आलेले नाही. तसेच, सुभाष नगर येथील एसआरए प्रकल्प 15 वर्षे रखडला आहे. आता गांधीनगर येथील उर्वरित 1800 झोपडीधारकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या महाकाली डेव्हलपर्स संचालित रिट्स प्राॅपर्टी इंडिया या कंपनीसाठी एसआरए अधिकारी पायघड्या का घालत आहेत, असा सवाल करीत रहिवाशांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान यांच्यासोबत एसआरए अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विकासक बदलण्याची कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. 

यावेळी मनोज प्रधान यांनी, नळपाड्याचे १५०० घरं त्याच्यात आहेत आणि एक विकासकाला एसआरए योजना राबविण्यास सहमती देण्यात येत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्याच्या विरोधात डाॅ.जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले होते. लोकांचं म्हणणं असं आहे की, ज्यांनी सुभाषनगर डेव्हलप करू नाही शकला, जो गांधीनगर डेव्हलप करू नाही शकला, तेथील लोक रस्त्यावर आहेत, तिथल्या लोकांना भाडं मिळत नाहीये. मग असं असताना आणखीन नळपाड्याच्या १५०० लोकांना कुठे ते न्याय देऊ शकतील? आणि तरीही एसआरएमध्ये अधिकारी हट्ट का करीत आहेत. याबाबत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी अधिकार्यांना फैलावर घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही त्या विकासकाला सहमती देणार नाही आणि एक पत्र उमेश अग्रवाल यांना उद्या देण्यात येणार आहे. तसेच, विकासक बदलण्याची कारवाई सुरू होईल, असे सांगितले. ​दरम्यान, उमेश अग्रवाल यांनी सांगितले की, एक महिन्यापासून आम्ही एसआरए कार्यालयाशी पत्रव्यवहार करत आहोत.

आज ​या लढ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षापूर्वी माळवी साहेबांनीच माध्यमांसमोर सांगितले होते की, तुमचा जर विरोध असेल तर तुम्ही सर्वसाधारण सभा घ्या. ​त्यानुसार आम्ही सर्वसाधारण सभा घेण्याची तयारी केली आणि एसआरएकडे पत्र दिले. परंतु, एसआरएकडून आम्हाला असे सांगण्यात आले की, "आम्ही तुम्हाला त्या दिवशी प्राधिकृत अधिकारी उपलब्ध करून देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही तुमची सभा घेऊन त्याचे इतिवृत्त आणि व्हिडिओ सादर करा."

​त्यानुसार १५ जुलै रोजी नळपाडा गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सदस्यांची आणि समितीच्या माध्यमातून पत्रव्यवहार व व्हिडिओ सादर करण्यात आला. ​१५ तारखेला व्हिडिओ सादर करून १० दिवस उलटले तरी कोणतेही उत्तर मिळाले नाही, त्यामुळे आम्हाला शेवटी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धाव घ्यावी लागली. ​आज डाॅ.जितेंद्र आव्हाड आल्याने त्यांनी आम्हाला उद्या पत्र देण्याची हमी दिली आहे, आता त्याचे उत्तर काय येते ते आम्ही पाहू. येथे ​बिल्डरांची दलाली करण्याचे काम इकडे चालू आहे. बिल्डर लोकांची बाजू कशी मांडता येईल हे एसआरए करते, पण गोरगरिबांच्या जनतेची मागणी कोणी ऐकत नाही, म्हणूनच आज आम्हाला डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जावे लागले. यापुढेही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला हमी दिली आहे की जर न्याय भेटला नाही, तर डाॅ. आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्यासोबत आमच्याबरोबर कोर्टाची लढाई लढायला तयार आहेत.

यावेळी नळपाडा येथील शेकडो रहिवाशी उपस्थित होते..

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषण.

ही बातमी शेअर करा: