वेक अप ठाणेकर खर्चिक रिंग मेट्रोविरोधात आक्रमक
शासनाला सुचविल्या दहा उपाययोजना , शासन आणि ठामपाचे 8 हजार 200 कोटी वाचण्याचा दावा
ठाणे (प्रतिनिधी) : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२,२०० कोटी रुपयांच्या 'अंतर्गत रिंग रूट मेट्रो' प्रकल्पाला 'वेक अप ठाणेकर' या नागरिकांच्या संस्थेने विरोध दर्शवला आहे. . या संदर्भात वेक अप ठाणेकरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठामपा आयुक्त सौरव राव यांना निवेदन देऊन 12 हजार 200 कोटीपैकी फक्त 2000 कोटी खर्च करून उत्तम परिवहन व्यवस्था कार्यन्वित करणे शक्य असल्याचा दावा वेक अप ठाणेकर या संस्थेने केला आहे.
ठाणे शहरात अंतर्गत वाहतुकीसाठी रिंग मेट्रो सुरू करण्याची प्रक्रिया कार्यन्वित करण्यात आली आहे. हा प्रकल्प वेळखाऊ आणि शहराच्या दृष्टीने गैरलागू असल्याचा आरोप करीत वेक अप ठाणेकर संस्थेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वेक अप ठाणेकर संस्थेने याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, रिंग मेट्रोसाठी १२ हजार २०० कोटींचा खर्च करूनही ठाणेकरांची वाहतूक समस्या सुटणार तर नाहीच उलटपक्षी पुढील १० वर्षे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्याऐवजी शहरात २० ते ३० सीटर इलेक्ट्रिक बस ५ ते १० मिनिटांच्या अंतराने चालवणे, ठाणे रेल्वे स्टेशन, तीन हात नाका, माजिवडा, बाळकूम, कपूरबावडी, वाघबीळ ते कासारवडवली असा रिंग रूट तयार करून नागरिकांची वाहतूक सुलभ करणे, रस्त्यांची रुंदी पाहून गर्दीच्या वेळेत बसेससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवणे, जीपीएस आणि डिजिटल भाडे प्रणालीसह बस-मेट्रो स्थानकांवर ई रिक्षा हब तयार करणे, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, अखंड आणि दिव्यांग-स्नेही पदपथ आणि स्कायवाॅक तयार करावेत, मेट्रो व रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक सायकल सुविधा उपलब्ध करावी, ठाणेणे स्टेशन, तीन हात नाका, माजिवडा आणि कपूरबावडी येथे सर्व प्रकारच्या वाहतुकीची साधने एकाच छताखाली आणावित, एआयचा वापर करून सिग्नल यंत्रणा अद्ययावत करावी, ठाणे खाडीवरून नवी मुंबई आणि इतर परिसरासाठी फेरी सेवा सुरू करावी आणि मोठ्या सोसायट्या आणि आयटी पार्क्ससाठी पीक अवर्समध्ये अॅप-आधारित शटल सेवा सुरू करावी, असः दहा उपाय वेक अप ठाणेकर या संस्थेने सुचविले आहेत. या सर्व उपाययोजनांसाठी दोन हजार कोटींच्या आतच खर्च होणार असल्याने ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाचे 8 हजार 200 कोटी रूपये वाचणार असल्याचा दावाही वेक अप ठाणेकरने केला आहे.
दरम्यान, अतिरिक्त महागड्या प्रकल्पाचा बोजा लादण्यापूर्वी परिवहन तज्ज्ञ, नगररचनाकार आणि नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पर्यायांचे मूल्यांकन करावे, अशी विनंती 'वेक अप ठाणेकर'तर्फे करण्यात आली आहे.
#newsdisha #thane #thanekar #ThaneMetro #RingMetro
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026
भूमी एकर्सचा "भूमी महाघोटाळा" ; शासनाची फसवणूक करून गोरगरीबांची घरे लाटली
09 Sep 2026
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मेजर डॉ. नितिन राठोड
08 Sep 2026
ठाण्यात बंजारा समाजाच्या भव्य तीज महोत्सवाची धूम
08 Sep 2026