26 वर्षाच्या युवकाने केले 37 हजार खातेदारांचा डेटा लिक, कोट्यावधी रुपये काढले
मुंबई : एका बनावट मोबाईल ॲपचा वापर करून देशभरात 63 कोटी रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य संशयिताला डीबी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 37,000 हून अधिक व्यक्तींची गोपनीय बँकिंग माहिती असलेला डेटाबेस हस्तगत केला असून, यामुळे एक मोठे सायबर संकट टळले आहे.
अटक करण्यात आलेली व्यक्ती झारखंडमधील 26 वर्षीय विद्यार्थी असून, त्याला कॉम्प्युटर कोडिंग आणि जावास्क्रिप्टचे (JavaScript) चांगले ज्ञान आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10 मोबाईल फोन, एक लॅपटॉप, 7 सिम कार्ड्स, 4 क्रेडिट/डेबिट कार्ड्स, 967 एपीके (APK) फाइल्स आणि 37,000 हून अधिक नागरिकांची गोपनीय बँकिंग माहिती जप्त केली आहे. डीसीपी रागसुधा आर. यांनी सांगितले की, आरोपी टेलिग्रामद्वारे सायबर गुन्हेगारांशी संपर्क साधून त्यांना ही बनावट ॲप्स विकत होता आणि तो प्रत्येक एपीके फाइलसाठी 15,000 ते 20,000 रुपये आकारत होता. तो गेल्या सहा महिन्यांपासून या बेकायदेशीर कामात गुंतलेला होता.
डीसीपी रागसुधा आर. यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सुरुवात मुंबईतील डीबी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीतून झाली. एका स्थानिक महिलेला ‘महानगर गॅस लिमिटेड’च्या नावाने एक फसवणुकीचा संदेश आला होता, ज्याद्वारे तिला एका बनावट ‘महानगर गॅस’ ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करण्यात आले. पीडित महिलेने आपल्या फोनवर ती एपीके फाइल इन्स्टॉल करताच, फसवणूक करणाऱ्यांनी तिच्या डिव्हाइसचा पूर्ण ताबा मिळवला आणि गोपनीय बँक खात्याची माहिती चोरून महिलेच्या खात्यातून 70 हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या (IT Act) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. यानंतर डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि सायबर सेल यांनी संयुक्तपणे तांत्रिक तपास सुरू केला.
सायबर पथकाने वैज्ञानिक विश्लेषण आणि तांत्रिक तपासणीद्वारे आरोपीचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर, पोलीस पथकाने झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आरोपीचा मागोवा घेतला आणि अखेरीस 24 जुलै रोजी त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली. चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याने इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करून एपीके फाइल्स तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले होते.
डीसीपींनी सांगितले की, या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने यापूर्वीच 91 बनावट APK फाइल्स इतर सायबर गुन्हेगारांना विकल्या होत्या. ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’च्या आकडेवारीनुसार, या 91 फाइल्सचा वापर करून देशभरातील एकूण 2,913 लोकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातील 512 नागरिकांचा समावेश आहे. या फाइल्सद्वारे देशभरातील लोकांकडून 63.69 कोटी रुपयांची मोठी रक्कम उकळण्यात आली आहे.
डीसीपी रागसुधा आर. यांच्या मते, आरोपीला अटक केल्यामुळे आणि 37 हजारहून अधिक व्यक्तींची गोपनीय बँकिंग माहिती हस्तगत केल्यामुळे एक मोठा सायबर गुन्हा टळला आहे. जर पोलिसांनी त्याला वेळीच पकडले नसते, तर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 967 नवीन बनावट फाइल्स आणि 37 हजारहून अधिक लोकांची गोपनीय बँकिंग माहिती इतर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली असती. यामुळे फसवणूक झालेल्यांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली असती आणि फसवणुकीची एकूण रक्कम सहजपणे 100 कोटी रुपयांच्या पुढे गेली असती. त्यामुळे आता या टोळीशी संबंधित इतर सायबर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि पैशांचा मागोवा घेण्यासाठी मुंबई पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026