बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे व फरकाची तसेच थकबाकीची वसुली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
बिडी कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत विविध कामगार संघटना आणि मालक संघटनांकडून आलेल्या निवेदनांची गांभीर्याने दखल घेत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या होत्या. त्यांनी दोन्ही संघटनांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले व २ जून २०२६ रोजी झालेल्या अंतिम बैठकीत दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींना सविस्तर निवेदने सादर करण्याचे निर्देश दिले होते. भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय स्तरावरील सचिव अनिल डुमणे यांनी निवेदन देऊन पुढाकार घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सोलापूर), महाराष्ट्र बिडी उद्योग संघ (पुणे), लाल बावटा बिडी कामगार युनियन (सिटू - सोलापूर) आणि महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघ (पुणे) या संघटनांची निवेदने कामगार आयुक्तांमार्फत शासनास प्राप्त झाली.
या निवेदनांच्या आधारे आयोजित सबंधित बैठकांमध्ये उपसचिव दीपक पोकळे यांनीही त्यांच्या स्तरावर कार्यवाही केली. बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराच्या पुनर्निर्धारणाबाबत विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवण्यात आले. विधि व न्याय विभागाने नोंदवलेल्या अभिप्रायानुसार, १० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे घोषित केलेले किमान वेतनाचे दर सद्यस्थितीत लागू असून त्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही कायदेशीर स्थगिती नाही. त्यामुळे सदर वेतनाची अंमलबजावणी करण्यात कोणताही कायदेशीर अडथळा उरलेला नसून सक्षम प्राधिकरणांनी या दरांची कठोर अंमलबजावणी करावी व देय थकबाकी, फरकासाठी वसुलीची कार्यवाही सुरू करावी, असा स्पष्ट अभिप्राय देण्यात आला.
विधि व न्याय विभागाच्या या अभिप्रायाला अनुसरून शासनाने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रान्वये कामगार आयुक्तांना १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्यासह सुधारित वेतनाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन निश्चितीनुसार बिडी कामगारांना सर्व महानगर पालिका हद्द असलेल्या परिमंडळ-१ मध्ये मूळ वेतन २१० रुपये आणि महागाई भत्ता १६९ रुपये मिळून एकूण ३७९ रुपये प्रतिदिन वेतन देय राहील. तर सर्व महानगरपालिका हद्द वगळून उर्वरित इतर कार्यक्षेत्र असलेल्या परिमंडळ-२ मध्ये मूळ वेतन १९२ रुपये आणि महागाई भत्ता १६९ रुपये मिळून एकूण ३६१ रुपये प्रतिदिन वेतन १००० बिड्या वळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
शासनाने थकबाकी व फरकाची वसुली प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्यामुळे राज्यातील हजारो बिडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, कामगार वर्गातून कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
#newsdisha
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात ‘रंग निती’ आणि ‘रास उत्सव’ उत्साहात संपन्न
16 Oct 2026
आयडीबीआय बँक विदेशी कंपनीला विकणे देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी
16 Oct 2026
ठाण्यात मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमाचे भव्य शुभारंभ
16 Oct 2026
कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिपाई भरतीत तीन टक्के आरक्षण
16 Oct 2026