Site Logo
मुंबई

‘जेजे’ मधील अतिविशेषोपचार रूग्णालयाच्या इमारती च्या कामाला गती : वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ

प्रकाशित: 11 Aug 2026, 08:52 PM
80 Views
Featured News Image

मुंबई : मुंबईतील सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या १२०० खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत. या इमारतीची ए, बी, सी, डी अशा प्रकारे विभागणी केली आहे. जेजे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, बेस्ट उपक्रम आणि बांधकाम कंपनीने दिलेल्या वेळेत गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

            मंत्रालयात जेजे अतिविशेषोपचार रूग्णालय बांधकामाच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चं.बं. चाकोते, उदय पालवे, उपअभियंता सतीश धर्मसाले, वरिष्ठ अधिकारी, कपॅसाईट इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कटियार आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, ए आणि बी इमारतीचे ड्रेनेज, फॉल्स सिलिंग, स्वच्छता, अंतर्गत पेंटिंग, फर्निचरची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करावीत. सी आणि डी इमारतीमधील लिफ्ट, प्लॅस्टर, फरशी काम, बेसमेंट स्लॅब, प्लम्बिंग आणि एसटीपीची कामेही गतीने करावीत. वैद्यकीय उपकरणे आणि फर्निचर कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने काही जागा मोकळी करून द्यावी.बेस्टने पॉवर ट्रान्समिशनचे काम वेगाने करावे. जेजे प्रशासनाने कोणता विभाग कोणत्या मजल्यावर ठेवायचा तसेच उपकरणांचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.


वैद्यकीय शिक्षण आणि उपचार सुविधांना बळ

     अतिविशेषोपचार रुग्णालयामुळे केवळ रुग्णसेवाच नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणालाही मोठी चालना मिळणार आहे. जे.जे. समूह रुग्णालय हे राज्यातील महत्वाचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा केंद्र असल्याने या नव्या सुविधेमुळे गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

            राज्यातील नागरिकांना त्यांच्या जवळच दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणाला या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळणार आहे.अतिविशेषोपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून रुग्णांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: