Site Logo
मुंबई

'महा आरोग्य शिबिराला' राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रकाशित: 29 Jul 2026, 09:31 PM
82 Views
Featured News Image

९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला, ८९४० नागरिकांनी रक्तदान केले, ८,२४६ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई (कविराज चव्हाण) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'महा आरोग्य शिबिराला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून आरोग्यसेवा थेट जनतेच्या दारी पोहोचविण्यात यश आले असून ९५ हजार नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ देण्यात आला. ८,२४६ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विविध विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरात एकूण ४० शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयात विविध ठिकाणी एकाच वेळी हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयाने विभागनिहाय समित्या स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर, इंटर्न, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या अभियानात उल्लेखनीय योगदान दिले. स्वयंसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरले.

      राज्यभर राबविण्यात आलेल्या या अभियानात रक्तदान शिबिरे, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी, नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मुख कर्करोग तपासणी तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शिबिरांमध्ये तपासणीत संशयित अथवा बाधित आढळलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना तातडीने संबंधित रुग्णालयात पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

     २२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानातून ८,९४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच स्तन कर्करोग तपासणीत ८,२४२, गर्भाशय मुख कर्करोग तपासणीत ४,६३४, बोन मिनरल डेन्सिटी व अस्थिरोग तपासणीत १२,७३३, नेत्र तपासणीत १५,३९३ आणि मुख कर्करोग तपासणीत ९,६०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. विविध तपासण्यांनंतर ८,२४६ लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर जनजागृती कार्यक्रमांसह एकूण ९४,८७८ नागरिकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मुंबई (जे.जे. व जी.टी.), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, गोंदिया, अंबाजोगाई, लातूर, सातारा, अलिबाग आणि नाशिक येथे नियोजनबद्ध पद्धतीने विविध विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय शासकीय दंत महाविद्यालये मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे मुख कर्करोग तपासणी शिबिरे घेण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती आणि कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) हर्निया शस्त्रक्रिया, स्थूलता तपासणी आणि विशेष मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: