महाराष्ट्र पर्यावरण विभागाचे प्रोजेक्ट मुंबईसोबत सामंजस्य करार
पर्यावरण व हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासनाचा समन्वयक विभाग म्हणून कार्यरत राहणार; विविध शासकीय व नागरी संस्थांशी समन्वय साधणार
मुंबई : 'मुंबई क्लायमेट वीक' (MCW) फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग आणि ‘प्रोजेक्ट मुंबई’ यांच्यामध्ये सांमजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संस्थात्मक समन्वय अधिक बळकट करणे तसेच मुंबईतील हवामानविषयक कृतीसंदर्भातील चर्चेत शासनाचा सहभाग अधिक व्यापक करण्यात येणार आहे.'मुंबई क्लायमेट वीक'चे आयोजन २३ ते २६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत मुंबई, येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारानुसार, महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व हवामान बदल विभाग हा 'मुंबई क्लायमेट वीक २०२७'साठी महाराष्ट्र शासनाचा समन्वयक विभाग म्हणून कार्यरत राहणार आहे. ज्ञानविषयक भागीदार म्हणून सदर विभाग ‘प्रोजेक्ट मुंबई’ला क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनासाठी सहकार्य करणार आहे. तसेच संबंधित शासकीय विभाग व संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. 'मुंबई क्लायमेट वीक २०२७'च्या विविध विषयांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रमुख व्यक्ती आणि महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्रालये, आयुक्त तसेच सचिव यांच्यामध्ये निश्चित कालमर्यादेत समन्वय व बैठका आयोजित करण्यासाठी सदर विभाग आवश्यक ते सहकार्य करणार आहे. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांचाही समावेश आहे.
'मुंबई क्लायमेट वीक २०२७' मध्ये होणाऱ्या चर्चा आणि विविध विषयांवरील कार्याचा प्रत्यक्ष स्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय संस्थांशी अधिक प्रभावी संबंध प्रस्थापित करणे हा या भागीदारीचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये शहरांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता, अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण, जैवविविधता आणि परिपत्रक अर्थव्यवस्था या प्रमुख विषयांचा समावेश आहे. याबरोबरच साहित्य, खाद्यसंस्कृती, क्रीडा, चित्रपट आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांशी हवामान बदलाचा असलेला संबंधही 'मुंबई क्लायमेट वीक'मध्ये अधोरेखित करण्यात येणार आहे.
या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या,
“'मुंबई क्लायमेट वीक २०२७'साठी ‘प्रोजेक्ट मुंबई’सह भागीदारी करताना महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व हवामान बदल विभागाला आनंद होत आहे. 'मुंबई क्लायमेट वीक २०२७' हे शासन, उद्योग, नागरी समाज, तज्ज्ञ आणि नागरिकांना एका व्यासपीठावर आणणारे आहे. महाराष्ट्र तसेच भारताची हवामानविषयक कृती आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्याची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील पर्वाला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, ही भागीदारी हवामानविषयक नेतृत्व अधिक बळकट करण्यास तसेच हवामानविषयक सहकार्य आणि शाश्वत नागरी विकासासाठी 'मुंबई क्लायमेट वीक २०२७' हे अधिक प्रभावी व्यासपीठ बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. अर्थपूर्ण हवामान कृतीला चालना देणे, हवामान बदलाच्या
परिणामांना सामोरे जाण्याची क्षमता बळकट करणे आणि शाश्वत भविष्याच्या दृष्टीने योगदान देण्यासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ तसेच सर्व संबंधित घटकांसह काम करण्यास विभाग उत्सुक आहे.”
हवामान बदलाच्या परिणामांच्या दृष्टीने प्रभावी आणि कृतीशील उपाययोजना विकसित करण्याच्या दृष्टीने या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक आणि 'मुंबई क्लायमेट वीक' चे मुख्य संयोजक शिशिर जोशी म्हणाले, “महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने आमचा ज्ञानविषयक भागीदार म्हणून सहभाग स्वीकारल्याबद्दल ‘प्रोजेक्ट मुंबई’ला आनंद आहे. या माध्यमातून 'मुंबई क्लायमेट वीक' मधील चर्चा प्रत्यक्षात प्रभावी ठरणाऱ्या संकल्पना, भागीदारी आणि उपाययोजनांमध्ये रूपांतरित होतील आणि त्यांचा दीर्घकालीन परिणामकारक उपाययोजना विकसित करण्यास चालना मिळेल.”
हवामान बदलाचा मुंबईच्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पाणी, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा आणि शहरी लवचिकतेच्या (शहरांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता) नियोजनाशी असलेला संबंध दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर 'मुंबई क्लायमेट वीक २०२७' हे शासन, उद्योग, नागरी समाज, शैक्षणिक संस्था तसेच हवामानविषयक क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.या सामंजस्य करारामुळे 'मुंबई क्लायमेट वीक २०२७' साठीची संस्थात्मक चौकट अधिक बळकट झाली आहे. या भागीदारीमुळे मुंबईतील हवामानविषयक उपक्रम आणि शासनाचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे एकत्रित करता येणार आहेत. #newsdisha
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026