आगरी समाज संस्थेच्या ‘रूढी–परंपरा परिसंवाद’ मालिकेचा शुभारंभ उत्साहात संपन्न
अलिबाग (प्रतिनिधी ): आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने समाजातील रूढी, परंपरा आणि प्रथा यांची माहिती संकलित करून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रूढी–परंपरा परिसंवाद’ मालिकेतील पहिला परिसंवाद श्री क्षेत्र भुवनेश्वर, नारंगी येथील सभामंडपात, शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. या पहिल्या परिसंवादासाठी चरी ते शिरवली–माणकुळे परिसरातील एकूण २२ गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने संस्थेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या पहिल्या परिसंवादाचा विषय ‘अंतिम कार्य आणि त्यानंतरचे विधी’ असा होता. गावागावांमध्ये प्रचलित असलेल्या प्रथा, परंपरा आणि त्यांचे वेगवेगळे स्वरूप समजून घेणे, त्यांची माहिती संकलित करणे आणि हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात नरेंद्र पाटील, पेढांबे यांनी उपस्थित मान्यवर आणि समाजबांधवांचे स्वागत करून केली. त्यानंतर आगरी समाज संस्थेचे सल्लागार श्री नंदकुमार (बाळा) पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच रूढी–परंपरा परिसंवाद आयोजित करण्यामागील भूमिका, या उपक्रमाची आवश्यकता आणि कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिसरातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अर्जुन गावंड गुरुजी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आगरी समाज संस्थेच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विशेषतः समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचे संकलन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम अभिनव व दूरदृष्टीचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एका गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी रूढी आणि परंपरा यांमधील फरक सोप्या आणि समजण्यास सुलभ पद्धतीने स्पष्ट केला. तसेच या परिसंवाद मालिकेचा मुख्य हेतू, माहिती संकलनाची पद्धत आणि पुढील वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले.
समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध प्रथा आणि परंपरांचा अभ्यास करताना प्रत्येक गावाचे वेगळेपण समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रथेची तुलना करून ती योग्य किंवा अयोग्य ठरवणे, अथवा कोणत्याही गावावर विशिष्ट परंपरा लादणे, हा या परिसंवादाचा उद्देश नसल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक