Site Logo
महाराष्ट्र

एकांगी नव्हे तर तटस्थ, समग्र अभ्यासक्रमाची गरज : सहसरकार्यवाह अतुल लिमये

प्रकाशित: 16 Oct 2026, 05:18 PM
27 Views
Featured News Image

पुणे : शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि हिंसक आंदोलनांचे स्वरूप अत्यंत चिंताजनक आहे. डाव्या विचारविश्वाने अभ्यासक्रमांच्या माध्यमातून केवळ संघर्षाची मांडणी केली आहे. त्यामुळेविद्यार्थ्यांना निव्वळ उपभोक्ता न बनवता त्यांच्यात 'विजिगीषू वृत्ती' निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानपरंपरा आणि समग्र दृष्टिकोनाचा समावेश करणे अनिवार्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पुणे महानगर यांच्या वतीने शनिवारी स. प. महाविद्यालयातील भाऊसाहेब चितळे सभागृहात ‘नवोन्मेष: अभ्यास मंडळ सदस्य संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील अभ्यास मंडळांचे (बीओएस) अध्यक्ष व सदस्यांसाठी हे विशेष सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनास भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री बी. आर. शंकरन (शंकरानंदजी), मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व भारतीय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सुहास पेडणेकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ. रविकुमार चिटणीस उपस्थित होते.

     शिक्षणातील बदलांचा ठेका राजकीय पक्षांचा नाही

उपस्थितांशी संवाद साधताना लिमये म्हणाले, "देशाला 'विकसित भारत' बनवायचे असेल, तर शिक्षणाचा पाया असलेला अभ्यासक्रम भक्कम हवा. शिक्षणातील परिवर्तनाचा ठेका कोणत्याही राजकीय पक्षाला न देता समाजाने आणि शिक्षणतज्ज्ञांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षणात तटस्थता आणून इतिहासासोबतच पर्यावरण, विज्ञान, राज्यशास्त्र आणि न्यायशास्त्र या विषयांमध्येही भारतीय दृष्टिकोन अंतर्भूत केला पाहिजे."


- वसाहतवादी मानसिकतेतून मुक्तीची गरज : 

प्रस्ताविक करताना डॉ. रविकुमार चिटणीस म्हणाले, "पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. गेल्या अनेक दशकांपासून आपली शिक्षण व्यवस्था पाश्चात्त्य चष्म्यातून पाहिली जात होती. युवकांना निव्वळ 'उपभोक्ता' न बनवता आत्मजागृत आणि वैश्विक नेतृत्व देणारे नागरिक घडवण्यासाठी आपल्याला वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल." बी. आर. शंकरन म्हणाले, "भारतीय दृष्टिकोन हा एकांगी नसून शारीरिक, मानसिक, भावनात्मक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्व अंगांचा विकास करणारा समग्र व अखंड दृष्टिकोन आहे." ‘भारतीय ज्ञानपरंपरेशी नाते जोडूया; शिक्षणातून भारतीयता रुजवूया’ या संकल्पाने कार्यक्रमाचा समारोप झाला. राजेंद्र जमदाडे यांनी आभार मानले.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: